

Merchant Banking Scam: Suspect Praveen Puri Apprehended
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या महाघोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या गुन्ह्यात सक्रिय सहभाग असलेला संशयित आरोपी प्रवीण पांडुरंग पुरी (वय ३२, रा. पेरजापुर, ता. भोकरदन) याला शनिवारी (दि. ९) अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
वेअर हाऊसच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून १७७ बनावट खातेदारांच्या माध्यमातून हा सुमारे २३ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला होता. याप्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेला सोपवला आहे.
तपासादरम्यान आतापर्यंत खालील ९ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुख्य सुत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ यांच्यासह इतर राजेंद्र भिकचंद टोकशा, (मर्चट बँक महाव्यवस्थापक), नटवर सत्यनारायण दायमा (शाखा अधिकारी, भोकरदन शाखा), गणेश रमेश साबळे (कुरंगळ यांचा मॅनेजर), सहकारी निलेश्वर शेषराव भोसले, रामेश्वर विलासराव जाधव, ज्ञानेश्वर विलासराव जाधव, सुधाकर रावसाहेब ठोंबरे यांना यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपअधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) सुरेश उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक शैलेश म्हस्के आणि पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, श्रेयस वाघमारे यांनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू असून पोलीस चौकशीत आणखी अनेक मोठी नावे समोर येण्याची दाट शक्यता आहे.