

Manoj Jarange Demand Maratha Reservation
वडीगोद्री : आम्ही २ वर्षांपासून संयमाने घेतले आहे. ४ दिवसांत ४ मागण्यां पूर्ण करू असे सरकारने शेवटचे उपोषण सोडविताना सांगितले होते. पण ३ महिने झाले, कोणत्याही मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. आम्ही किती दिवस संयम ठेवायचा, आता आम्ही सर्वात मोठा उठाव करणार आहोत. २९ ऑगस्ट २०२५ रोजी आम्ही मुंबईला येऊन आमच्या मागण्यां पूर्ण करून घेणार असल्याचा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज (दि.३०) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत दिला.
मुंबईत उपोषण हे आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर करणार असून मुंबईला सोबत जाताना एक विजयरथ व एक स्वर्ग रथ घेऊन जाणार आहे. मराठ्यांची विजययाञा नाही, तर माझी अंत्ययात्रा निघणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. मला फक्त २८ ला सोडायला पोर येतील. २९ ला ते परत जातील. २८ ऑगस्टच्या आधी सगळ्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे. आमच्या संयमाचा अंत सरकारने बघू नये.
आंदोलनाच्या नियोजन टप्पे कसे असतील हे मी १ ऑगस्टला सांगणार आहे. तरी ६ जूनच्या आत आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा मुंबईत आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत.
सरकारने आपली १०० टक्के फसवणूक केली आहे. तिन्हीही गॅझेटीयर लागू केले नाहीत. संस्थांच्या नोंदी घेतलेल्या नाहीत, सगे सोयरे अंमलबजावणी केलेली नाही. मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढला नाही. मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढण्यासाठी ५८ लाख पुरावे खूप झाले, असे जरांगे म्हणाले.
पहलगाम हल्ल्याचा निषेध करतो. पाकिस्तान नुसता भीती दाखवत आहे. दहशतवाद विरोधातील लढ्यात सगळा देश सरकारच्या सोबत आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असेही जरांगे म्हणाले.