

अंबड : ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीने क्लिप मागविल्याचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे. तपासासाठी आवश्यक असलेल्या ऑडिओ क्लिप देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, या क्लिपचा सोर्स (स्रोत) मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे. आम्ही सोर्स देऊ; परंतु संबंधित व्यक्तीच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची हमी मुख्यमंत्र्यांनी द्यावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली.
ऑडिओ क्लिप तपासासाठी वकिलांमार्फत देण्यास सांगण्यात आले आहे. क्लिपमध्ये कोण बोलले आणि त्याचा सोर्स काय आहे, हे सांगण्यास आमची तयारी आहे. मात्र, सोर्स सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्ट हमी द्यावी, असे जरांगे म्हणाले.
ऑडिओ क्लिपमध्ये पैशांच्या जोरावर बोलले जात असल्याचे मराठा समाजाच्या लक्षात आले आहे. आम्ही कोणालाही दुखावलेले नाही. आमच्या विरोधात बोलणाऱ्यांना आरक्षणाची माया नव्हती, तर पैशांची माया होती. सरकारकडून पैसे घेऊन आमच्या विरोधात बोलवले जात असल्याचे आता उघड झाले आहे. आमच्याविरोधात बोलणाऱ्यांना बोलवणारे कोण आहेत, यामागे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
शेतकरी बांधवांनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार शक्य होईल तशी दिवाळी साजरी करावी. मात्र, सण साजरा करण्यासाठी कोणीही कर्ज काढू नये. आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच दिवाळी साजरी करावी. संकटाचा काळ निघून जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता आत्महत्येपासून दूर राहावे, असे भावनिक आवाहन मनोज जरांगे यांनी केले.