वडीगोद्री : सरकारला सांगतो, आमच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमवारी उपोषणाला बसण्यापूर्वी केली. हैदराबाद मुक्ती दिनाच्या मध्यरात्रीपासून त्यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी आमच्या व्याख्येनुसार करा, राज्यभरात कुणबी प्रमाणपत्र ह्या, शिंदे समितीचे नोंदी शोधण्याचे काम करा, मराठा पुन्हा सुरू आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या, या मागण्यांसाठी आम्ही स्थगित केलेले आमरण उपोषण आजपासून पुन्हा सुरू करत आहोत.
जरांगे म्हणाले, आंदोलन करताना कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे-घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द यापुढे बोलणार नाही. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, एवढ्यासाठीच आंदोलन आहे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचे नाही. आम्ही सरकारला स्पष्टपणे सांगतोय, आमचे मुख्य ध्येय आरक्षण आहे. नंतर पुन्हा म्हणू नका, राजकीय भाषा वापरतोय म्हणून. मराठा आणि कुणबी एकच असून, आम्हाला बाकीच्या विषयावर बोलायचे नाही.