

Manoj Jarange Prasad Lad Press:
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि कुणबी दाखल्याबाबत सरकारी पातळीवर होत असलेल्या दिरंगाईवरून उपोषणाचे हत्यार पुन्हा उपसण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रसाद लाड हे आज जालनामध्ये जरांगे यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी पत्रकारांसमोरच जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू झाली.
या चर्चेत जरांगे बोलत होते आणि प्रसाद लाड ऐकून घेत होते. प्रशासकीय पातळीवर कुणबी प्रमाणपत्र देताना कसा गोंधळ घातला जातो याचे उदाहरणासह माहिती देत असतानाच जरांगे पाटील यांनी भाजपला टोला लगावला. त्यांनी आम्ही शिंदेंच्या नेत्यांना किंवा अजितदादांच्या नेत्यांना फोन केला की ते आमचे त्वरित काम करून देतात. त्यामुळं ते मराठ्यांच्या मनात बसले आहेत. तुम्हीही आमच्या मनात बसा असं म्हणाले.
जरांगे लाडानां उद्येशून म्हणाले, 'उदय सामंत साहेब येतात. शिंदेंचे सगळेच मंत्री येतात. तुमचेही येतात मात्र दिसत नाहीत. अजितदादांचे देखील येतात. ते बिचारे प्रमाणिक काम करतात. तुम्ही जर त्यांना दम भरला तर समाजाचं वाटोळं होईल. ते काम करतात ते अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात. ते ताबडतोब अॅक्शन घेतात. म्हणून ते मराठ्यांच्या मनात बसलेत. तुम्ही देखील बसा आमचं भांडणच नाहीये. त्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं ना राव... का त्यांच्या मागं लागता, मजेत रहा ना दोघं.'
जरांगे पुढे म्हणाले की, ती माणसं कामं करतात. तुमचेही काही करतात. बावनकुळे साहेबांना दोनचार कामे सांगितली. चौथ्या मिनिटाला काम झालं. ते ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन लावतात. तुमचे शेलार साहेब देखील करतात. मागं दोन चार कामं केली. पोलीस भरतीच्या अडचणी दूर केल्या. विखे पाटील देखील करतात आम्ही त्यांच्याशी भांडतो देखील. उदय सामंत यांचा मी काही प्रवक्ता नाही त्यांच्याशी आम्ही भांडतो देखील. काम नाही केलं तर आम्ही त्यांना देखील सोडत नाही. चुकल्यावर कुणाला सोडत नाही. मला माझ्या समाजापेक्षा मोठं कोणी नाही.'
जरांगेंनी शिंदे आणि अजितदादा गटाच्या नेत्यांचे कौतुक करत भाजपला चांगलाच आरसा दाखवला. प्रसाद लाड कोचवर बसून जरांगेंचा हा झंजावात नुसता ऐकत होते अन् मान डोवलत होते. जरांगेंच्या अस्सल ग्रमीण ढंगातल्या वक्तव्यांवर लाड यांनी हसून अनेकवेळा दाद देखील दिली.