

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठ्यांनी राजकारण विषय हा डोक्यातून काढून टाकला आहे आणि आता आरक्षणाची लढाई सुरू होणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगितले.
अंतरवाली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकार कोणत्या पक्षाचे येणार याबाबत अंदाज सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही मैदानात नव्हतो, त्यामुळे मी अंदाज सांगू शकत नाही. जर मी मैदानात असतो तर शंभर टक्के अंदाज सांगितला असता. राज्यातील कोणताही उमेदवार मराठ्याच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि हे अंतिम सत्य आहे. आता निवडणूक विषय संपलेला आहे. सरकार स्थापन झाले की, उपोषणाची तारीख जाहीर करणार असल्याचे जरांगे म्हणाले. उमेदवार कोणताही निवडून आला म्हणजे तो काही मालक झाला नाही, त्याला मराठ्यांनी निवडून दिले आहे.
या निवडणुकीत फायदा कोणाचा होईल, मी निवडणुकीत नसल्याने कोणाचा फायदा किंवा कोणाचा तोटा होईल हे मला सांगता येणार नाही. मराठ्यांनी कोणाला मतदान केले हे आता मराठे मला सांगणार आहेत. कोणत्याही उमेदवाराने बेईमान होऊ नये. गद्दारी केली तर तुला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. उपोषणाची तारीख आपण सरकार स्थापन झाली की, घोषित करणार आहोत. गावात कुठेही उपोषण करायचे नाही. आमरण उपोषण अंतरवाली सराटीमध्येच करायचे आहे.
आता शेवटची फाईट करून निर्णायक आंदोलन करायचे आहे आणि आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केले आहे, त्यांनी आता मराठ्यांच्या अडीअडचणीत उभे राहायचे, असे जरांगे म्हणाले. मराठ्याच्या मतांवर निवडून आला आणि पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने बोलला तर मराठे त्याचा दुमता काढतील. मराठ्यांनी त्याला मते दिली आहेत आणि म्हणून त्याला राज्यात फिरायची पंचायत होईल.