कोल्हापूर: पुढारी ऑनलाईन
'मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट न दिल्याने त्यांचा आक्रमकपणा स्वाभाविक आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील लढाई यशस्वी होईल,' असे मत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गुरुवारी नाशिक येथे खासदार संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषदेत आक्रमक झाले होते. यावेळी संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा विनंती करूनही भेट दिली नाही, असा आरोप केला. तसेच महाविकास आघाडीवरही रोष व्यक्त केला.
मुश्रीफ म्हणाले, 'संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी होईल. संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर महाविकासआघाडी सरकार सकारात्मक आहे . त्यांच्या सर्व मागण्याची पूर्तता करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. संभाजीराजेंनी पहिल्यांदाच असा रुद्रावतार धारण केलेला आम्हाला पहायला मिळाला. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार वेळा विनंती करूनही भेट दिली नाही. त्यांच्या पत्राकडे मोदींनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेला संताप योग्यच आहे. शिवाय महाविकास आघाडीबाबत व्यक्त केलेली नाराजी आम्ही समजू शकतो. यापुढे त्यांच्या नेतृत्वाखालील लढाई लढून मराठा आरक्षण मिळवू.' असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते संभाजीराजे
नाशिक येथे भूमिका मांडताना ते म्हणाले, 'माझी भूमिका ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आण जनतेची भूमिका एकच आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत जबाबदारी झटकत आहेत. पण, मराठा समाजाला याच्याशी काही घेणं-देणं नाही. टीमटीम करणारे माझ्या भूमिकेवर बोट ठेवत आहेत. मी छत्रपतींचा वंशज आहे, मला कोणी शिकविण्याची गरज नाही. मी शांत आहे, ही महाराजांची शिकवण आहे. मी आक्रमक होणार याआधी मार्ग काय काढणार, हे सांगा. सध्या मी महाराष्ट्र पिंजून काढतो आहे. अभ्यासू लोकांशी चर्चा करतो आहे. येत्या २७ मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. सगळ्या आमदार आणि खासदारांना माझी वॉर्निंग आहे, मराठी समाजाला विनंती आहे की, २७ मे पर्यंत शांत रहा", सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय दिल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. मागच्या सरकारने बोगस कायदा केला. या सरकारने न्यायालयात व्यवस्थित मांडणी केली नाही, या आरोप-प्रत्यारोपांशी समाजाला काहीही देणे-घेणे नाही. आता आम्हाला मार्ग हवा आहे, तो कसा काढता येईल, हे सांगा. येत्या २७ मे रोजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेत्यांना भेटून समाजाची भूमिका मांडणार आहे. तोपर्यंत समाजाने शांत राहावे.'