

वडीगोद्री : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत आंदोलन टोकाचे आंदोलन होणार असल्याचे सरकारच्या शिष्टमंडळासमोर स्पष्टपणे पुन्हा सांगितले. मराठा कुणबीच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांना २८ पूर्वी प्रमाणपत्रे द्यावीत, कुणबी प्रमाणपत्राला वैधता दिली जावी, सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध सर्व गॅझेटचे जीआर सरकारने काढावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
जरांगे यांच्या भेटीसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, आ. प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ सोमवारी अंतरवालीत आले होते. या वेळी उभय नेत्यांमध्ये जवळपास तीन तास चर्चा झाली. जरांगे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये असे विखे म्हणाले.
चर्चेनंतर जरांगे यांनी सरकार समाजाच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला. ५८ लाख नोंदी सापडल्याचे सरकारच सांगत असताना त्यांना प्रमाणपत्रे का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या नोंदींच्या आधारे तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ प्रमाणपत्रे देण्याचे आदेश द्यावेत, गावागावांत याद्या लावावाव्यात, १९६७ च्या नियमावलीनुसार आमच्या ज्या नोंदी आहेत, त्याप्रमाणे आम्हाला हक्क मिळालाच पाहिजे असे जरांगे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यामुळे मराठ्यांना मिळालेले कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला. अधिकाऱ्यांवर बावकुळे दबाव टाकत असल्याचे पुरावेच आपल्याकडे आहेत, असे ते म्हणाले. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे ३६४ कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र दिले तर मग व्हॅलेडेटी का दिले नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावेळी जरांगे यांनी शिंदे समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी नव्याने नोंदी सापडल्या आहेत, त्याबाबतचे दस्ताऐवज उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. या प्रकरणात सर्व तक्रारदार तरुणांनी २८ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत येऊन सरकारपुढे गाऱ्हाणी मांडावीत, असे जरांगे म्हणाले.
झारीतील शुक्राचार्यांचा बंदोस्त करू
मराठा आरक्षणात आड येणाऱ्या 'झारीतील शुक्राचार्या' चा बंदोबस्त करणार,काहीजणांकडून सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. आदेश देऊनही कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कुणी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असेल तर त्याची चौकशी करणार, असा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिला. यापुढे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यामध्ये कुणी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असेल तर त्याची चौकशी केली जाणार, अशी माहिती विखे यांनी दिली.