

संघपाल वाहूळकर
जालना ः एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांवर स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे 61 हजार एकल महिलांना या माध्यमातून आधार मिळणार आहे.
दरम्यान, महिला व बालकल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला आहे.
ही समिती विविध विभाग, अधिकारी आणि सामाजिक संस्थांशी चर्चा करून एकल महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणार आहे. या धोरणातून स्वतंत्र महामंडळ, कौशल्य विकास प्रकल्प, शासकीय योजनांमध्ये प्राधान्य, आरक्षण तसेच कर्ज प्रकरणांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
एकल महिलांच्या प्रकारानुसार पाहता, जिल्ह्यात 55 हजार 820 विधवा, 2 हजार 319 परित्यक्ता, 1 हजार 838 घटस्फोटीत तर 1 हजार 926 अविवाहित महिलांचा समावेश आहे. यावरून जिल्ह्यातील विधवा महिलांची संख्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठे आव्हान ठरत असल्याचे दिसून येते.
वयोगटनिहाय आकडेवारीनुसार, 51 ते 65 वयोगटातील 19 हजार 348 महिला, तर 65 वर्षांवरील 24 हजार 160 महिलांची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय 31 ते 50 वयोगटातील 15 हजार 74 आणि 18 ते 30 वयोगटातील 3 हजार 321 एकल महिलांची नोंद आहे. विशेष बाब म्हणजे 18 वर्षांखालील 6 हजार 798 एकल महिला असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्याने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून देशात एक आदर्श निर्माण केला आहे. या धोरणामुळे एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार आहे. स्वतंत्र महामंडळाची स्थापना, कौशल्य विकास प्रकल्प, शासकीय योजनांमध्ये प्राधान्य, आरक्षण तसेच कर्ज प्रकरणांना चालना मिळाल्याने एकल महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी मोठा आधार मिळेल. शासनाचा हा निर्णय एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि हक्कांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
एकनाथ राऊत, जिल्हा समन्वयक, एकल महिला समिती, जालना.
एकल महिलांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळणार राज्य शासनाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने कुटुंबाचा भार सांभाळणाऱ्या महिलांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे.
शिवाजी तायडे, समन्वयक बदनापूर.
तालुकानिहाय एकल महिलांची आकडेवारी
तालुका महिलांची संख्या
भोकरदन - 11376
जालना - 9865
अंबड - 7974
घनसावंगी - 7473
जाफराबाद - 6672
बदनापूर - 6440
परतूर - 6093
मंठा - 6010