

License by creating fake website
जालना, पुढारी वृत्तसेवा : बनावट वेबसाईट बनवून सरकारी संगणक प्रणालीमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करीत सरकारी प्रक्रियेचा दुरुपयोग करुन नागरीकांना बनावट लर्निंग ड्रायव्हींग लायसन्स मिळवून देणाऱ्या आरोपीस पोलिसांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून जेरबंद केले.
जालना शहरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अभिजित कडुबा बावस्कर यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जालना सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती कि, अज्ञात आरोपींनी एक बनावट वेबसाईट बनवुन सरकारी संगणक प्रणालीमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन सरकारी प्रक्रियेचा दुरुपयोग करीत नागरीकांना बनावट लर्निंग ड्रायव्हींग लायसन्स मिळवुन दिले.
या प्रकरणी अज्ञात आरोपितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या आरोपी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकगुणाजी शिंदे यांना आरोपींचा माग काढण्यासाठी सुचना दिल्या होत्या. या प्रकरणात आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमर शिव भारती (व्यवसाय-खाजगी नौकरी, रा. पिया एक्झोटीका, काहिलापारा, ता. दिसपुर, जि. गुवाहाटी, आसाम) यास वाराणशी येथे जेरबंद केले. आरोपी अस्तित्व लपवत असल्याने व राहण्याचे ठिकाण महाराजगंज, गोरखपुर, वाराणसी उत्-रप्रदेश असे वारंवार बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या.
त्यानुषंगाने तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीची माहिती प्राप्त केली असता आरोपी वाराणसी, उत्तरप्रदेश येथे असल्याचे दिसुन आल्याने वार- ाणसी येथे जावुन आरोपीताचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार संदीप मांटे, सचिन चौधरी यांनी केली आहे. आरोपीकडुन इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
आरोपीस ५ फेब्रुवारी पर्यंत कोठडी
सायबर गुन्हा शाखेच्या पोलिसांनी आरेपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. सदर गुन्ह्यामध्ये यापुर्वी कुपवाडा-जम्मू कश्मीर, सहरसा-बिहार, जालना येथून तीन आरोपी अटक केले आहे.