

ladki bahin Anganwadi beneficiaries teacher will conduct the verification
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील शेकडो महिलांना ई- केवायसी त्रुटीचा फटका बसला. चुकीच्या पर्यायांमुळे त्यांची नावे तात्पुरती रोखण्यात आली होती. त्यामुळे हप्ते थांबल्याने संतप्त महिलांनी तहसील व इतर सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारायला सुरुवात केली होती. प्रशासनाकडे तक्रारीचा पाऊस पडला होता.
लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना झालेल्या चुका अनेक महिलांसाठी अडचणीच्या ठरल्या होत्या. हप्ते थांबल्याने संताप व्यक्त होत असतानाच आता प्रशासनाने दिलासादायक पाऊल उचलले आहे. चुकीचा पर्याय निवडलेल्या पण पात्र असलेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
त्यामुळे अडकलेले हप्ते मिळण्याची आशा हजारो लाडक्या बहिणींना लागली आहे. केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. अशा पात्र लाभार्थ्यांना थेट अपात्र ठखवले जाणार नसून प्रत्यक्ष पडताळणीची संधी देण्यात आली आहे.
लाभार्थ्यांचे नाव, आधार केवायसी तपशील कुटुंबातील सरकारी नोकरी व उत्पन्न निकष यांची प्रत्यक्ष खातरजमा होणार आहे. चुकीची नोंद आढळल्यास दुरुस्तीची शिफारस केली जाईल. ई-केवायसीतील तांत्रिक अडचणी, उत्पन्नाच्या निकषांबाबत संभ्रम आणि कुटुंबातील लाभार्थी मोजणी यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
ई-केवायसीतील चुकीमुळे कोणतीही पात्र महिला वंचित राहू नये, हा प्रशासनाचा उद्देश आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर योग्य त्या महिलांना लाभ देण्यात येईल. सेविकांकडे असलेल्या पात्र महिलांच्या यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.