Kharif crops damaged : अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान
Kharif crops damaged due to heavy rains
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यात पिके पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
संततधार पावसामुळे तालुक्यात लागवड केली खरीप हंगामातील कपाशी, मका, मिर्ची, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अति पावसामुळे कपाशीची बोंडे सडली आहे. सोयाबीनचे पीक खराब झाले आहे.
अनेक भागातील सोयाबीन, कांदा, कांदा रोपे, मका, कपाशी या सारख्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची परीस्थिती ओढवली आहे. यावर देखील लक्ष देऊन पंचनामे करताना काळजीपूर्वक करावे, अशी व्यथा यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सर्वत्र नुकसान अधिक असल्याने सरसकट पंचनामे करून घेण्याची गरज आहे. या संकट काळात तातडीने मागील प्रलंबित पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झालेली नाही. त्यावरही कारवाई व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पंचनाम्याची प्रक्रिया वेळीच राबवावी
पंचनामे, पीकविमा आणि इतर किचकट प्रक्रिया या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी नंतर अडचणीच्या ठरतात. त्यामुळे पंचनामे वेळीच झाले, तरच नुकसान झालेली तीव्रता मांडली जाते. मागील अतिवृष्टीच्या काळात अनेक शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. त्यातच हे पुन्हा दुहेरी संकट आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तहसीलदार डॉ. भगत मॅडम यांनी तीव्रता आणि उद्भवलेली परिस्थितीची पाहणी करून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

