

घनसावंगी : जायकवाडी डाव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक 23 व 24 परिसरातील पाणी वापर संस्थांनी उत्कृष्ट समन्वय, नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर वसुलीत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या दोन्ही वितरिकांमधील संस्थांकडून 11 लाख 65 हजार 634 रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे. ही कामगिरी समाधानकारक व प्रेरणादायी ठरत आहे.
जायकवाडी वितरिका क्र. 24 अंतर्गत कार्यरत असलेल्या मत्स्योदरी, गोदावरी व जलसमृद्धी पाणी वापर संस्थांनी प्रभावी कार्यपद्धतीचा अवलंब करत 7 लाख 99 हजार 842 रुपयांची रक्कम वसूल केली आहे. गोदावरी पाणी वापर संस्थेचे विठ्ठलराव पघळ तसेच जलसमृद्धी पाणी वापर संस्थेचे राजेंद्र परदेशी यांनी शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवत वसुली मोहीम यशस्वी केली.
वितरिका क्र. 23 अंतर्गत कपिलेश्वर पाणी वापर संस्थेनेही सक्रिय भूमिका बजावत 3 लाख 65 हजार 792 इतकी वसुली करून मोलाचा वाटा उचलला आहे. या संस्थेचे लक्ष्मण कोपरे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत वेळेवर वसुली करण्यास प्राधान्य दिले, ज्यामुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली.
दोन्ही वितरिकांवरील संस्थांनी एकत्रितपणे केलेल्या या वसुलीमुळे जलसंपदा विभागाच्या महसूल वाढीस मोठी मदत झाली आहे. या निधीचा उपयोग पाणी व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी होणार असून, सिंचन व्यवस्थेत सुधारणा होऊन भविष्यात शेतकऱ्यांना अधिक सक्षम व सुलभ सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाणी वापर संस्थांचे जलसंपदा विभागामार्फत कौतुक करण्यात आले आहे. यापुढेही अशाच प्रकारे समन्वय ठेवून वसुलीत वाढ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर संस्थांनीही या कामगिरीतून प्रेरणा घेऊन वसुलीत भर घालावी, असे आवाहन विभाग 6 व 7 चे शाखाधिकारी कटकझोल यांनी केले आहे.