

Jalna's card organization Prohibited 750 child marriages
जालना, पुढारी वृत्तसेवा : भारत सरकारच्या 'बालविवाह मुक्त भारत' अभियानाला बळ देत जालना येथील सेंटर फॉर अॅग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थेने नंदुरबार जिल्हा एक वर्षात बालविवाह मुक्त करण्याचा ऐतिहासिक संकल्प जाहीर केला आहे. गत वर्षात सुमारे ७५० बालविवाह रोखण्यात संस्थेला यश आले आहे.
दरम्यान, आदिवासी परंपरेत लवकर विवाह करण्याची प्रथा अधिक असल्याने नंदुरबार जिल्हा हे मोठे आव्हान मानले जात असतानाच, ने सर्व शासकीय यंत्रणांसोबत समन्वय साधत व्यापक कृती आराखडा राबवण्यास सुरुवात केली आहे. 'बालविवाह मुक्त भारत' अभियानाचा पहिला वर्धापन दिन (२७ नोव्हेंबर २०२४) साजरा करताना कार्ड ने जिल्ह्यातील शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम, प्रतिज्ञा समारंभ, तसेच ग्रामसमुदायांमध्ये संवाद मोहिमा घेतल्या.
विवाह लावणारे धार्मिक नेते, केटरर्स, बँड पार्टी, टेंट पुरवठादार अशा सेवा देणाऱ्यांवर बालविवाहात सहभाग आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची माहितीही देण्यात आली. ही 'जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन' या देशातील २५० हुन अधिक संस्थांच्या राष्ट्रीय नेटवर्कची भागीदार असून, या नेटवर्कने गेल्या वर्षभरात देशभरात एक लाखाहून अधिक बालविवाह रोखण्याचे कार्य केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातही कार्डने मागील वर्षी ६७० बालविवाह थांबवले, अशी माहिती तालुका समन्वयक नटवर वसावे, आरती अहिरे आणि संजू सोनवणे यांनी दिली. सरकारच्या १०० दिवसांच्या तीव्र कृती आराखड्याने प्रेरित होऊन सचिव पुष्कराज तायडे म्हणाले, 'हा अभूतपूर्व समन्वय भारताच्या बालविवाह निर्मूलनाच्या दिशेने क्रांतिकारक ठरेल. मुलींवर अन्याय करणारी ही शतकानुशतकांची प्रथा आता संपुष्टात आणण्याची वेळ आली आहे.
आम्ही निश्चयपूर्वक सांगू शकतो की एका वर्षात नंदुरबार जिल्हा बालविवाह मुक्त बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. ही १०० दिवसांची मोहीम तीन टप्प्यांत राबवली जात असून तिचा समारोप ८ मार्च २०२६आंतरराष्ट्रीय महिला दिनी होणार आहे. या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्हा 'बालविवाह मुक्ती 'चे आदर्श मॉडेल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तीन टप्प्यांत मोहीम
पहिला टप्पा : शाळा व शैक्षणिक संस्था (३१ डिसेंबरपर्यंत) दुसरा टप्पा : धार्मिक स्थळे व विवाहसंबंधी सेवा (३१ जानेवारी २०२६) तिसरा टप्पा : ग्रामपंचायती व नगरपालिका प्रभागांमध्ये जनसहभाग (८ मार्चपर्यंत)