

जालना : जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील दुःखीनगर व बजाज गोडाऊन परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने आणि दुर्गंधी पसरल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
परिसरात सर्वत्र कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरत असून, साचलेल्या घाणीत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया तसेच इतर साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा स्थानिक नागरिक करीत आहे.