Jalna news: वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स फक्त नावालाच..!

कधी चालक गैरहजर, कधी डिझेल नाही तर कधी टायर खराब; आपत्कालीन रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूच
Jalna news: वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स फक्त नावालाच..!
Published on
Updated on

पारध : भोकरदन तालुक्यातील वालसांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देण्यात आलेली ॲम्बुलन्स सध्या केवळ नावापुरतीच असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कधी ॲम्बुलन्सचा चालक हजर नसतो, कधी वाहनात डिझेल नसते, तर कधी वाहनाचे टायर खराब असल्याचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसून, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा संताप परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Jalna news: वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स फक्त नावालाच..!
Jalna News : बांधकाम कामगार साहित्य गैरव्यवहार; कामगार अधिकारी जाधव यांना अटक

वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आठ गावसह अनेक गावांचा समावेश आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी ॲम्बुलन्स अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, प्रत्यक्षात हीच ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

अपघातात जखमी महिला ॲम्बुलन्सच्या प्रतीक्षेत

काही दिवसांपूर्वी वालसांगवी-पारध रोडवरील पद्मावती म्हसोबा परिसरात मोटारसायकल व मालवाहू ट्रकची जोरदार धडक झाली होती. या अपघातात एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. जखमी महिला आपल्या पतीसमोर घडलेले दुर्दैवी दृश्य पाहत घटनास्थळीच मदतीच्या प्रतीक्षेत होती.

स्थानिक नागरिकांनी तातडीने वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून ॲम्बुलन्सची मागणी केली. मात्र, त्यावेळी ॲम्बुलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. 'चालक बाहेरगावी असून वाहनाची चावी त्याच्याकडे आहे,' असे कारण आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असतानाही ॲम्बुलन्स वेळेत पोहोचू न शकल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

Jalna news: वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स फक्त नावालाच..!
Jalna News : वाकडी येथील पाणंद रस्त्याची दुरवस्था; चिखलामुळे शेतकऱ्यांची कोंडी: तहसील व ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

मृतदेह नेण्यासाठीही ॲम्बुलन्स मिळाली नाही

दोन-तीन महिन्यांपूर्वी वालसांगवी परिसरातील भाजपचे कार्यकर्ते गजानन लोखंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यावेळी मृतदेह नेण्यासाठी ॲम्बुलन्सची आवश्यकता निर्माण झाली. स्थानिक नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे काही वेळासाठी वाहन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. मात्र, 'ॲम्बुलन्सचे टायर खराब आहेत,' असे कारण सांगून वाहन उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

अखेर मृतदेह तीनचाकी रिक्षातून नेण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. आरोग्य केंद्राकडे ॲम्बुलन्स उपलब्ध असूनही ती आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येत नसेल, तर ती नेमकी कशासाठी? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

पद्मावती विहीर दुर्घटनेत पुन्हा ॲम्बुलन्सचा प्रश्न ऐरणीवर

वालसांगवी-पारध रोडवरील पद्मावती गावाजवळ काही दिवसांपूर्वी क्रेटा कार विहिरीत कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राला फोन करून ॲम्बुलन्सची मागणी केली. मात्र, जवळपास अर्धा ते पाऊण तास उलटूनही ॲम्बुलन्स घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.

पद्मावती ते वालसांगवी हे अंतर अवघे काही किलोमीटर असताना ॲम्बुलन्सला एवढा वेळ का लागला, असा सवाल उपस्थित होत आहे. बचावकार्यादरम्यान विहिरीतून बाहेर काढण्यात आलेल्या जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी वाहनाची गरज होती. मात्र, ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या खासगी वाहनाला हात दाखवून जखमींना बुलढाणा येथे उपचारासाठी नेण्यात आले. या विलंबादरम्यान एका महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे समोर आले. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर परिस्थिती वेगळी असती का, हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

Jalna news: वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स फक्त नावालाच..!
Jalna farmers news : हिरव्या मिरचीचे आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

'ॲम्बुलन्स फक्त गरोदर महिला व 112 साठी'?

या सर्व घटनांनंतर तालुका आरोग्य अधिकारी तसेच वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. ही ॲम्बुलन्स केवळ गरोदर महिला आणि 112 सेवेसाठी उपलब्ध करून देता येते, अशी भूमिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मात्र, अपघात, हृदयविकाराचा झटका, गंभीर दुखापत अथवा इतर आपत्कालीन परिस्थितीत काही मिनिटेही रुग्णाच्या जीवासाठी महत्त्वाची असतात. अशा वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स उपलब्ध न झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी नेमके कोणाकडे धाव घ्यायची? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

आरोग्य विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी

वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स नियमितपणे कार्यरत ठेवावी, चालकाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, वाहनात पुरेसे डिझेल उपलब्ध ठेवावे, वाहनाची तांत्रिक स्थिती तपासावी आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने सेवा मिळेल याची हमी द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

अपघातग्रस्तांसाठी ॲम्बुलन्स ही जीवनवाहिनी असताना तीच वेळेवर उपलब्ध होत नसेल, तर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा नेमका उपयोग काय? असा सवाल आता वालसांगवी, पद्मावती, पारध आणि परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि ॲम्बुलन्स सेवा सक्षम करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Jalna news: वालसांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्बुलन्स फक्त नावालाच..!
Jalna Agriculture News : सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव; कृषी विभागाच्‍या मार्गदर्शनाची गरज

ग्रामपंचायत सदस्य कल्याण पाटील, पद्मावती

“भोकरदन-वालसांगवी रोडवरील पद्मावती गावाजवळ दोन दिवसांपूर्वी रोडलगत असलेल्या विहिरीत क्रेटा गाडी कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक महिला गाडीतच अडकून होती, तर एक महिला व एक पुरुष यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी मी स्वतः ॲम्बुलन्सला फोन केला होता. मात्र, ॲम्बुलन्स वेळेवर घटनास्थळी पोहोचली नाही. जवळपास अर्धा ते पाऊण तास आम्हाला ॲम्बुलन्सची प्रतीक्षा करावी लागली.

अखेर वेळ निघून जात असल्याने आम्ही रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या एका खासगी वाहनाला थांबवून विहिरीतून बाहेर काढलेल्या दोन्ही जखमींना बुलढाणा येथे उपचारासाठी पाठविले. मात्र, त्यातील एका महिलेचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. जर ॲम्बुलन्स वेळेत घटनास्थळी पोहोचली असती, तर कदाचित त्या महिलेचा जीव वाचला असता, अशी आमची भावना आहे. त्यामुळे पद्मावती परिसरातील ॲम्बुलन्स सेवेचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्घटनेत रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी पद्मावती परिसरात कायमस्वरूपी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे.”

logo
Pudhari News
pudhari.news