

जालना : मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने जालना जिल्ह्यासाठी २६ व २७ जून रोजी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 जून रोजी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 27 जून रोजीही यलो अलर्ट कायम राहणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
28 जून रोजी हलका ते मध्यम तर 29 जून रोजी पुन्हा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 30 जून रोजीही मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना वादळी हवामानाच्या काळात झाडाखाली उभे राहू नये, विजांचा कडकडाट सुरू असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा तसेच वीजवाहक वस्तूंपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
मोकळ्या मैदानात, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा धातूच्या कुंपणाजवळ थांबू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या मालाची काळजी घ्यावी तसेच जनावरांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्ष, संबंधित तहसील कार्यालय अथवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.