

अंबड : तालुक्यातील दूधपुरी येथे जावयाच्या वर्षश्राद्धसाठी नातेवाईकाच्या मोटरसायकलवरून जाऊन परतत असताना ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत ट्रकखाली सापडून आजी व नातवाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.७) सायंकाळी ५.१५ च्या सुमारास अंबड-पाचोड रोडवर घडली. आजी गोपिका रामभाऊ वाघ (वय ५०) व नातू विशाल कृष्णा पवार (वय १ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, गोपिका वाघ यांची मुलगी सावित्री कृष्णा पवार हिला अश्विनी (वय २ वर्ष) व विशाल (वय १) अशी दोन मुले आहेत. पती कृष्णा पवार (रा. दूधपुरी ता. अंबड जि.जालना) यांचे गेल्या वर्षी निधन झाल्याने ती दावरवाडी (ता. पैठण) येथे आपल्या माहेरी राहत होती. सोमवारी (दि.७) पती कृष्णा पवार यांचे वर्षश्राद्ध असल्याने ती आपल्या आई व मुलांसह दोन मोटरसायकलीवरून दूधपुरी येथे गेली होती. कार्यक्रम आटपून नातेवाईक लखन गायकवाड याच्या मोटरसायकलवरून आजी गोपिका नातू विशालसह येत होत्या. तर पाठिमागे एका नातेवाईकाच्या मोटरसायकलवरून सावित्री पवार ही मुलगी अश्विनी हिच्यासह येत होती. लखन गायकवाड याची मोटरसायकल अंबड-पाचोड रोडवर आली असता पाठिमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाला. तर मोटरसायकलस्वार लखन किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष घोडके आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.