

भोकरदन : तालुक्यातील जवखेडा ठोंबरी येथील पवन भगवान गिलगे या भुसार व्यापाऱ्याने जवखेडा ठोंबरी व केदारखेडा परिसरातील शेतकऱ्यांना करोडो रुपयांना चुना लावला आहे. हा व्यापारी शुक्रवारी 30 मे रोजी भोकरदन पोलीस ठाण्यात हजर झाला असताना फसवणूक झालेल्या शेकडो पुरुष व महिला शेतकऱ्यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात जमा होऊन आंदोलन केले. यानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
जवखेडा ठोंबरी येथील व्यापारी पवन भगवान गिलगे याचा भुसार मालाचा धंदा असून राम ट्रेडर्स या नावाने त्याचे दुकान आहे तो गेल्या काही वर्षापासून या परिसरातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मका, कापूस इत्यादी शेतमाल खरेदी करत होता. सुरुवातीला त्याचा व्यवहार चांगला असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला व त्याला शेतकरी आपला शेतमाल उधारी मध्ये देऊ लागले.
यातून परिसरातील शेतकऱ्यांचे त्याच्याकडे तीन ते चार कोटी रुपये थकले मात्र हे पैसे तो देत नसल्याने सदरील बाब काही शेतकऱ्यांनी साधारण पंधरा ते वीस दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या कानावर घातली होती. त्यानुसार त्यांनी त्याच्याशी संपर्क करून त्याला भोकरदन पोलीस ठाण्यात बोलवले होते. त्यानुसार तो शुक्रवारी 30 मे रोजी त्याच्या वकिलासह हजर होताच या ठिकाणी शेकडो महिला व पुरुष शेतकरी जमा झाले व त्यांनी आंदोलन केले. व त्याला ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र पोलीस निरीक्षक किरण बिडवे व कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढून हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
संबंधित भुसार व्यापारी भोकरदन पोलीस स्टेशन येथे हजर झाला असता शेकडो संतप्त शेतकरी पोलीस ठाण्यात जमा झाले होते. मात्र सदरील व्यापारी व शेतकरी यांच्या मध्ये मी व पोलीस कर्मचाऱ्यांनी समन्वय घातला आहे. या व्यापाऱ्याला थोडा वेळ देण्यात आला असून या कार्यकाळात तो त्याची दुकान व इतर जागा विक्री करण्यात येणार असून यातून संबंधित शेतकऱ्यांचे थकित पैसे देण्यात येणार आहे.
किरण बिडवे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे भोकरदन