

Jalna Hasanapur Godavari River Sand Smuggling
शहागड: अंबड तालुक्यातील हसनापूर गोदावरी नदीपात्रात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करावर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे जमादार लक्ष्मीकांत आडेप, सतीश धांडगे, कैलास चेके हे वाहनाने पोलीस ठाणे गोंदी हद्दीमध्ये अवैध वाळूची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हसनापूर शिवारातील गोदावरी नदी पात्रातून काही लोक विना परवाना अवैधरित्या वाळू काढून तिची चोरटी वाहतूक करीत आहेत.
त्यानंतर गोंदी येथील पोलीस अंमलदार सुरेश राठोड यांना हसनापूर नदी पात्रात शनिवारी मध्यरात्री दोन ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना दिसले. यावेळी एक ट्रॅक्टर चालक अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर सोडून पळून गेला. तर दुसऱ्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीमधील वाळू खाली केली. दरम्यान, दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ट्रॅक्टरची पाहणी केली असता दीड ब्रास वाळू आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी विनानंबर ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करत १० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन्ही ट्रॅक्टर चालकाविरुद्धात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास जमादार चरणसिंग बामणावत करत आहेत.
अंबड तालुक्यातील पाथरवाला बु. येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणारे २ टॅक्ट्रर २ लोडर चालकांवर गोंदी पोलिसांनी कारवाई करत ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी कृष्णा दत्तात्रय घोगंडे, महेश भिमराव रुचके (रा. पाथरवाला) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची तीन पथके इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, बाबा डमाळे ,नवनाथ राऊत, शाकेर सिध्दीकी, दीपक भोजने, सलमान सय्यद यांनी केली .