

Jalna tops in medical college construction
संघपाल वाहूळकर
जालना : राज्यामध्ये जालन्यासह एकूण १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजूरी देण्यात आली होती. या मंजूर झालेल्या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामाबाबत जालना जिल्हा टॉपवर आहे. जागेसह, विविध परवानग्या काढून सध्या २६ एकरात संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाकडून जालन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. त्यासाठी शासनाने ४०३ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जालना-अंबड रोडवरील काजळा गावाजवळ असलेल्या गणेशनगर गट क्रमांक ५४ येथे सध्या संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सुमारे २६ एकराच्या पसाऱ्यात हे शासकीय महाविद्यालय पसरले आहे.
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भाड्याने घेतलेल्या एका इमारतीत सुरू आहे. एमबीबीएसच्या प्रथम वर्षांच्या १०० विद्यार्थ्यांचे प्रवेशही झालेले आहेत. येत्या काही दिवसात त्यांच्या परिक्षाही होणार आहे. द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागते. यासाठी वैद्यकीय व तंत्रशिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यासोबत सामंजस्य करार देखील झालेला आहे.
जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार होते, तेव्हापासून प्रयत्न केले. त्यानंतर शासनाने जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी दिली. याच कॉलेजसाठी कुंबेफळ, कन्हैय्यानगर, रेवगाव, गोलापांगरी, ड्रायपोर्ट, देवमुर्ती, सिंधी काळेगाव आदी ठिकाणी जागांची अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती.
अखेर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गणेशनगर येथील गट नंबर ५४ मधील २६ एकर जमीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दिली. मागच्या वर्षी २३ जानेवारी २०२४ ला जालना तहसीलदार छाया पवार यांच्याकडून ही २६ एकर जागा मेडिकल कॉलेजसाठी हस्तांतरीत करण्यात आली.
दरम्यान, जालना-अंबड रोडवरील गणेशनगर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम येत्या २०२७ पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. त्यासाठी शासनाने यश नंद इंजिनियर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टरर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून निवड केली आहे. सध्या कंत्राटदाराच्या माध्यमातून संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे.
हे कामही येत्या काही दिवसात अंतिम टप्प्यात येत आहे. त्यानंतर वसतिगृहाचे काम केले जाणार आहे. अंबड रोड परिसरातील जालना शहराचा पुढील काळात झपाट्याने विस्तार होणार आहे. शिवाय या गणेशनगरपासून अंबड शहरही २० ते २२ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे जालना शहरासह अंबड शहराला या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा फायदा होणार आहे.