

Jalna The Divine Manifestation of Shiva and Shakti Unfolded Through Dance
जालना, पुढारी वृत्तसेवा येथील कलावर्धिनी ग्रुपच्या वतीने आयोजित शिवशक्ती-समरस्यम या भरतनाट्यम नृत्य सादरीकरणाने जालनेकर रसिकांना एका आध्यात्मिक आणि कलात्मक प्रवासाची प्रचिती दिली. प्रसिद्ध नृत्यांगना ईशिता आणि ईशानी कुलकर्णी (मृगनयनी भगिनी) यांनी बहारदार सादरीकरणातून शिव आणि शक्तीची विविध रूपे रंगमंचावर जिवंत केली. जेईएस महाविद्यालयाच्या चुन्नीलालजी गोयल सभागृहात हा अविस्मरणीय सोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात 'श्री विघ्न राजम भजे' या गणेश वंदनेने झाली. सगुण ते निर्गुण अशा प्रवासाचा वेध घेत मृगनयनी भगिनींनी 'अलारिषु' आणि 'नर्मदा जतीस्वरम' सादर केले. नर्मदा नदीचा उगम आणि तिचा जीव-नप्रवाह एखाद्या स्त्रीच्या जीवनप्रवासासारखा भासत असल्याचे नृत्यातून प्रभावीपणे मांडण्यात आले.
त्यानंतर ईशिता कुलकर्णी हिने देवी पार्वतीचे स्वरूप असणारे 'उच्छिष्ट चंडालीनी' हे एकल नृत्य सादर केले, तर ईशानी कुलकर्णी हिने भगवान शिवाच्या स्तुतीपर 'शंकर श्री गिरी नाथ प्रभू' या हिंदी रचनेवर नेत्रदीपक पदलालित्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः शिव आणि पार्वतीच्या सृष्टी सृजनत्वाचे प्रतीक असलेल्या 'अर्धनारीश्वर' नृत्याने प्रेक्षकांना एका अद्भुत आणि दैवी आविष्काराचा अनुभव दिला. कार्यक्रमाची सांगता 'तिल्लाना' ने करण्यात आली.
कार्यक्रमाचा प्रारंभ कलवर्धिनीचे सदस्य डॉ. गणेश अग्निहोत्री, डॉ. सुजाता देवरे, गुरु डॉ. व्ही. सौम्याश्री आणि विद्या राव यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाला. याप्रसंगी शाहीर आप्पासाहेब उगले, डॉ. यशवंत सोनुने, शाहीर रामानंद उगले, शिवकुमार बैजल, प्रा. कल्याण उगले यांसह कलवर्धिनीचे सदस्य व रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुलभा कुलकर्णी यांनी नृत्यांगनांचे स्वागत केले.
नृत्यातून वाहणारी नर्मदा
कार्यक्रमातील नर्मदा जतीस्वरम हे सादरीकरण रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले. अमरकंटक येथील नर्मदा नदीचा उगम आणि तिचा खळाळता प्रवास मृगनयनी भगिनींनी आपल्या मुद्रांमधून साकारला. यावेळी रंगमंचावर प्रत्यक्ष जलप्रवाह वाहत असल्याचा भास निर्माण झाला. एका स्त्रीचा जन्म, तिचे बालपण आणि तिचा प्रगल्भजीवनप्रवास याचे सुंदर रूपक या नृत्यातून उलगडले गेले.