

शरद मुळे
सुखापुरी : युवक राजेश कोरकणे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रूई गावातील ग्रामस्थांच्या वतीने अंबड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी गावातील शेकडो महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच सामाजिक न्याय मंत्री यांना हे निवेदन पाठविण्यात आले. निवेदनामध्ये आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे, पीडित कुटुंबास न्याय व सुरक्षा देण्यात यावी तसेच निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. ग्रामस्थांनी “राजेशला न्याय मिळालाच पाहिजे”, “खुन्यांना फाशी द्या” अशा जोरदार घोषणा देत संताप व्यक्त केला. महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
राजेश कोरकणे हत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीती, संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील युवकांमध्ये तीव्र नाराजी असून महिलांमधूनही मोठा आक्रोश व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत, “आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,” असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा या प्रकरणाकडे कोणत्या भूमिकेतून पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.