Jalna rainfall shortage : जालना जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद संकट!

पावसाची पाठ; जिल्ह्यात १७.६ टक्के तूट, घनसावंगी, अंबड, परतूर सर्वाधिक पिछाडीवर
Jalna rainfall shortage
Jalna rainfall shortagepudhari photo
Published on
Updated on

जालना : पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू असतानाही जालना जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यावर आता दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे. १ जून ते ८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४११.३ मिमी पाऊस झाला असून, आजपर्यंत अपेक्षित ४९९.१ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल ८७.८ मिमी तूट आहे. अपेक्षित पावसाच्या केवळ ८२.४ टक्केच पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाची अनिश्चितता कायम आहे. काही भागात जोरदार सरी कोसळल्या, तर अनेक ठिकाणी पावसाने मोठे खंड दिले. आता पावसाळ्याचे दिवस हातातून निसटत असताना पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Jalna rainfall shortage
Jalna News : मोसंबीच्या बागेवर फिरवला जेसीबी

घनसावंगी तालुक्याची सर्वाधिक बिकट अवस्था असून येथे अपेक्षित पावसाच्या केवळ ६६.७ टक्के पाऊस झाला आहे. अंबडमध्ये ७३.९ टक्के, परतूरमध्ये ७३.५ टक्के, मंठ्यात ७५.५ टक्के तर भोकरदनमध्ये ९८ टक्के पाऊस झाला आहे. जालना तालुक्यात ८९.२, बदनापूरमध्ये ८६.४ आणि जाफराबादमध्ये ८८.६ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. म्हणजेच आठपैकी एकाही तालुक्यात अपेक्षित पावसाची शंभर टक्के भरपाई झालेली नाही.

पावसाची परिस्थिती किती गंभीर आहे, हे ८ सप्टेंबरच्या आकडेवारीवरूनही स्पष्ट होते. जिल्ह्यात या दिवशी सरासरी अवघा ०.९ मिमी पाऊस झाला. जालना, बदनापूर, जाफराबाद आणि मंठा या तालुक्यांत पावसाची नोंदच झाली नाही. भोकरदनमध्ये १.६ मिमी, परतूरमध्ये ४.१ मिमी, अंबडमध्ये ०.७ मिमी आणि घनसावंगीमध्ये १ मिमी पाऊस झाला.

Jalna rainfall shortage
Jalna Zilla Parishad protest : विकासकामांत टक्केवारी अन् ग्रामपंचायतींची गळचेपी

पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिकांना निर्णायक टप्प्यावर पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाला आहे.

दुष्काळाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

पावसाचे उरलेले दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र पावसाने आणखी दडी मारल्यास पिके, पाणी आणि रब्बी हंगाम या तिन्ही आघाड्यांवर संकट अधिक गडद होण्याची भीती आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील सद्यस्थिती ही केवळ पावसाची तूट नसून आगामी काळातील गंभीर जलसंकटाची चाहूल ठरत आहे. महावेध प्रणालीवरील ८ सप्टेंबरच्या आकडेवारीने जिल्ह्यातील पावसाचे वास्तव समोर आणले असून, प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news