

जालना : खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील अनिश्चितता तसेच पावसाच्या खंडाचा पिकांच्या परिस्थितीवर परिणाम झाला आहे. १४ सप्टेंबरअखेर जूनपासून जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस हा या कालावधीतील सरासरी पर्जन्यमानाच्या केवळ ८१.० टक्के झाला आहे.
सप्टेंबरमध्ये १४ तारखेपर्यंत सरासरीच्या केवळ ३३.१ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांच्या परिस्थितीची संयुक्त पाहणी करून जिल्ह्याचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.
जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक ११ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी संयुक्त पीक पाहणी समित्यांची स्थापना करण्यात आली.
या समित्यांमध्ये उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ व विषयतज्ज्ञांचा समावेश करण्यात आला.
समित्यांनी या बाबींची केली पाहणी
या संयुक्त समित्यांनी संबंधित तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रभेटी करून विविध पिकांची सद्यःस्थिती, पावसातील खंडामुळे पिकांवर झालेला परिणाम, पिकांची वाढ व उत्पादनाची संभाव्य स्थिती आदी बाबींची पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या संयुक्त पीक पाहणी समित्यांनी आपले अहवाल सादर केले असून, त्याआधारे जिल्ह्याचा संकलित प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार व्यवस्थापन
शासन स्तरावर या अहवालाची आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने शासनामार्फत पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत. पिकांची सद्यःस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, पिकांची अवस्था आणि स्थानिक पर्जन्यमानाचा विचार करून कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पुढील पीक व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.