

जालना : जालना पोलिसांनी अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल ७१ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घनसावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुंज गावाजवळ गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून तिची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.
गुंज बसस्थानक परिसरात शुक्रवारी (दि. १०) पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांचे पथक पाहताच वाहनचालकांनी अंधाराचा फायदा घेत वाहने घटनास्थळीच सोडून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू आढळून आली. या कारवाईत साडेसात ब्रास वाळू, दोन हायवा, एक ट्रॅक्टर-ट्रॉली, एक कार आणि दोन मोबाईल हँडसेट असा एकूण ७१.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फरार झालेल्या अज्ञात वाहनचालकांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू आणि अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत सपोनि योगेश खटकळ, पोलिस अंमलदार निखिल गायकवाड, प्रताप सुंदरडे, पोलिस निरीक्षक केतन राठोड, पोलिस हवालदार गोळदे तसेच पोलिस कॉन्स्टेबल पोटे यांनी सहभाग घेतला.
जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात जालना पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊनही वाळूमाफियांनी वाळू चोरी थांबवली नसल्याचे चित्र आहे. अवैध विना नंबर प्लेटच्या हायवा महामार्ग व शहरातून धावताना दिसत आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही वाळूमाफिया सक्रिय असल्याचे चित्र आहे.