जालना : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध चंदनझिरा पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा; रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकलसह एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, आकाश रमेश गायकवाड (वय नमूद नाही, रा. सुंदरनगर, चंदनझिरा, जालना) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
७ नोव्हेंबर २०२६ रोजी चंदनझिरा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सुंदरनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, आकाश गायकवाड हा बेकायदेशीरपणे गावठी कट्टा कमरेला बाळगून बुलेट मोटारसायकलवर फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तातडीने सूत्रे हलविली.
पोलिस अधीक्षक तेजस्वीसिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक डॉ. विक्रम साळी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या पथकाने सुंदरनगर येथील देशलाई किराणा स्टोअर्सच्या पाठीमागील गल्लीमध्ये सापळा रचला. संशयित आरोपी बुलेटवरून येताना दिसताच पोलिसांनी त्याला वेढा घालून थांबवले आणि त्याची झडती घेतली.
झडतीदरम्यान त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आढळला. पोलिसांनी कट्ट्यासह १ लाख रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट मोटारसायकल (क्रमांक MH-२१-CE-५३०२) असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष मोहीम
दिवाळी सण शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा यासाठी जालन्यात पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. अवैध शस्त्रे बाळगणारे आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.