Chhatrapati Sambhajinagar road accident : अंधारात वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने कारचा अपघात

कन्नड : नंदुरबार येथील पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar road accident
संभाजी विश्वनाथ कांबळेpudhari photo
Published on
Updated on

कन्नड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कन्नड बायपास शहराजवळ सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या कार अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अंधारात वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने कांबळे यांची कार थेट दुभाजक तोडून सर्व्हिस रोडवरील मातीच्या ढिगाऱ्यात जाऊन अडकली. संभाजी विश्वनाथ कांबळे (वय ५२) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते माजी सैनिक होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर संभाजी कांबळे हे नंदुरबार येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. सोमवारी मध्यरात्री ते नंदुरबारहून कारने (एमएच २० एचएच ३६८७) छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी येत होते. कन्नड शहराजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर उड्डाणपूल व सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. मध्यरात्रीच्या अंधारात वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने कांबळे यांची कार थेट दुभाजक तोडून सर्व्हिस रोडवरील मातीच्या ढिगाऱ्यात जाऊन अडकली.

Chhatrapati Sambhajinagar road accident
Mula Dam water storage : धरणात पाणी; पण पिके तहानलेलीच !

ही माहिती उद्योजक योगेश कोल्हे यांना कळताच त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कांबळे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. कन्नड हद्दीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामकाजातील हलगर्जीपणा वाहनचालकांच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. महामार्गावरील अनेक उड्डाणपुलांवरील पथदिवे गेल्या पाच महिन्यांपासून बंद असून, कन्नड बायपासजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीच्या मार्गात करण्यात आलेल्या बदलाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची तसेच दिशादर्शक रेडियम फलकांची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

महामार्ग विभागाने तातडीने बंद पथदिवे सुरू करावेत, धोकादायक वळणांवर पुरेसा प्रकाश द्यावा तसेच स्पष्ट दिशादर्शक व रेडियम फलक बसवावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar road accident
Latur political News : लातूरच्या राजकीय संस्कृतीला आता आत्मपरीक्षणाची गरज

अंधारामुळे अपघाताचा धोका

चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या वाहनांना अचानक वळण घ्यावे लागत असल्याने अंधारात वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. गेल्या दोन दिवसांत याच महामार्गावर दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. हतनूरजवळ साईराज बिडवे या २० वर्षीय एकुलत्या एक तरुणाचा, तर कन्नड बायपासजवळ एका पोलिस कर्मचारी संभाजी कांबळे यांचा अपघाती मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news