

Jalna N.P. Election: Nomination papers to be filed from today
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील तीन नगर पालीकेतील ३१ प्रभागातील ६३ नगर सेवक व ३ नगराध्यक्षांच्या निवडीसाठी २ डिसेबर रोजी होणाऱ्या निवडणुकीकरीता सोमवार (१०) पासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासनाकडुन जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालीकेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व्युव्ह रचना केली आहे.
जालना जिल्ह्यातील परतुर, भोकरदन व अंबड या तीन नगर पालीकांच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी सोमवार पासुन उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चबांधणी केली आहे. परतुर नगर पालीकेच्या ११ प्रभागातुन २३ सदस्यांसह १ नगराध्यक्ष, भोकरदन पालीकेच्या १० प्रभागातुन २० सदस्यांसह १ नगराध्यक्ष तर अंबड नगर पालीकेच्या ११ प्रभागातुन २२ सदस्यांसह १ नगराध्यक्ष निवडुन देण्यासाठी निवडणुक होत आहे.
सोमवार पासुन या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. १९ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु राहणार असुन २० नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. २१ रोजी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी नंतर निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
जिल्ह्यातील परतुर व भोकरदन या दोन पालीकांमधे यापुर्वी काँग्रेसची सत्ता होती. मात्र परतुरचे माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी काही दिवसापुर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) मधे प्रवेश केल्यामुळे त्यांच्या ताब्यातील परतुर नगर पालीकेवर झेंडा फडकविण्यासाठी इतर पक्षाच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. भोकरदन पालीकेत कॉग्रेसची सत्ता होती. या निवडणुकीत ती कायम ठेवण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना यश मिळणार का याकडे सर्वाचे लक्ष आहे. अंबड नगर पालीका यापुर्वी भाजपाच्या ताब्यात होती.
उमेदवार व सुचक अनुमोदकालाच परवानगी
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवारांनी वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त वाहनांचा समावेश करु नये. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे १०० मीटर परिसरात तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या अवारात फक्त उमेदवार, सूचक व अनुमोदक अथवा दोन व्यक्ती यांना परवानगी दिली जाणार आहे.
आचारसंहिता मोडणाऱ्यांवर नजर
जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड आणि भोकरदन नगरपरिषदांच्या निवडणुकांची घोषणा होताच आच-ारसंहिता लागू झाली आहे. या काळात नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी इशारा दिला की, आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध वाहतूक किंवा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास तातडीने कारवाई केली जाईल. त्यांनी सांगितलं की, गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई जायील. जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. निवडणूक कालावधीत कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्यांबाबत पोलिसांकडून दया दाखवली जाणार नाही, असा इशारा जिल्हा पोलीस आधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिला.