

Jalna News: Protest staged by bringing meat into the Municipal Corporation premises
जालना, पुढारी वृत्तसेवा : जुना जालना परिसरातील मटन मार्केटमध्ये कथित गोवंश हत्या होत असल्याच्या माहितीनंतर रविवारी (दि. २) दुपारी बजरंग दलाचे गौरक्षक कार्यकर्ते पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. या कारवाईदरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि खाटीक समाजातील काही नागरिकांमध्ये वाद होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या द्वारावर आंदोलन करताच महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.
बदरम्यान, कारवाईपूर्वी पोलिसांना माहिती देऊनही पुरेसे संरक्षण मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेनंतर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत कार्यकर्ते आक्रमक झाले. या घटनेचा निषेध म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कथित गोवंशाचे मांस महापालिका परिसरात आणून ठिय्या आंदोलन सुरू केले.
यावेळी 'गोवंश हत्या थांबवा', 'अवैध मटन मार्केटवर कारवाई करा' अशा घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित मटन मार्केट महापालिकेच्या जागेवर सुरू असल्याचा दावा करत कार्यकर्त्यांनी अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ हालचाल करत संबंधित मटन मार्केटवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली.
दरम्यान, कथित गोमांस जप्ती, हल्ल्याचे आरोप आणि महापालिकेची कारवाई यामुळे जुना जालना परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली.