

Roof leakage in the Municipal Corporation's Establishment-2 Department
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत पदाधिकारी व नगरसेवकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज दालने, सभागृह उभारण्यात आले आहे. तर दुसरीकडे प्रशासनासाठी महत्त्वाच्या असलेल्या आस्थापना-२ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गळक्या छताखाली काम करण्याची वेळ आली आहे. या विभागाच्या छतातुन सलग तीन दिवसांपासून पावसाचे पाणी कार्यालयात झिरपत असून, सेवा पुस्तिका व महत्त्वाच्या शासकीय अभिलेखांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सलगच्या पावसामुळे महापालिका प्रशासनासाठी महत्वाच्या असलेल्या आस्थापना-२ विभागाच्या छताला गळती लागली आहे. मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील या विभागात टेबल, खुर्चा आणि फाइल्सवर थेट पाणी पडत असून, गळती रोखण्यासाठी ठिकठिकाणी बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच साचलेले पाणी सतत काढण्यासाठी एका कर्मचाऱ्याला दिवसभर फरशी पुसण्याचे काम करावे लागत असल्याने नियमित प्रशासकीय कामकाजही विस्कळीत झाले आहे.
या विभागात कामगार विभागाशी संबंधित सेवा पुस्तिका, कर्मचारी अभिलेख आणि इतर महत्त्वाच्या फाइल्स ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या कार्यालयाच्या भिंती व छतामधून झिरपणारे पाणी या कागदपत्रांपर्यंत पोहोचत असल्याने त्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. हा विभाग अलीकडेच दुसऱ्या मजल्यावरील या जागेत स्थलांतरित करण्यात आला.
यापूर्वी येथे एनयूएलएम व महिला बचत गटांचे कार्यालय होते. दरम्यान विषय समिती सभापती व गटनेत्यांसाठी स्वतंत्र दालने उपलब्ध करून दिल्यानंतर आस्थापना-२ विभाग येथे हलविण्यात आला. या विभागाच्या स्थलांतरानंतर गळतीचा प्रकार समोर आल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सेवापुस्तकांसह अभिलेखे खराब होण्याचा धोका
आस्थापना-२ विभागात कर्मचारी सेवापुस्तकांसह आस्थापना अभिलेख आणि अन्य महत्त्वाच्या शासकीय फाइल्स ठेवण्यात आल्या आहेत. छत व भिंतीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळे ही कागदपत्रे खराब होण्याचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात तातडीने दुरुस्ती करून अभिलेखांचे संरक्षण करण्याची मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.
कोट्यवधींच्या दालनांचा झगमगाट, कर्मचाऱ्यांना गळके छत
महापालिकेत विषय समिती सभापती व विविध पक्षाच्या गटनेत्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चुन सुसज्ज दालने व सभागृहे उभारण्यात आली. मात्र, त्याच इमारतीतील महत्त्वाचा आस्थापना-२ विभाग गळक्या छताखाली काम करत आहे. सुविधांच्या प्राधान्यक्रमाबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.