

Jalna News: Pedestrian assaulted; gold chain worth two lakhs snatched!
जालना, पुढारी वृत्तासेवा : शहरातील गजबजलेल्या सिंधी बाजार भागात ट्रॅफिक जामचा फायदा उठवून एका बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण करत गळ्यातील २ तोळ्यांची सोन्याची साखळी (चेन) बळजबरीने हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मनीष नगर (संभाजीनगर, जालना) येथील रहिवासी असलेले बांधकाम व्यावसायिक गिरीश शंकर चिलका (वय ५३) हे बुधवारी (दि. १०) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सिंधी बाजार परिसरात आंबे खरेदी करण्यासाठी आले होते.
आंबे घेऊन ते आपल्या मोटारसायकलने परत जात असताना, ग्लोबल मोबाईल शॉपीसमोर प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते. त्यावेळी पाठीमागून कोणीतरी हॉर्न वाजवला. यावरून चिलका यांच्या दुचाकीसमोर असलेल्या मोटारसायकलवरील तीन जणांपैकी तोंडओळखीचा असलेला फैजल अब्दुल नफीज पहेलवान (रा. रहमांगज, जालना) हा संतप्त झाला.
त्याने चिलका यांना "हॉर्न का वाजवतोस?" असे म्हणून अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान संशयित आरोपी फैजल याने चिलका यांच्या गळ्यातील अंदाजे २ लाख रुपये किमतीची २ तोळ्यांची सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून घेतली. जखमी झालेल्या चिलका यांनी सदर बाजार पोलिसात दिलेल्यी तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक संदीप सुभाष भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रामकिसन वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हॉर्न का वाजवला म्हणत केली मारहाण
फैजल आणि त्याच्यासोबत "मी हॉर्न वाजवला नाही, पाठीमागून आवाज आला," असे चिलका यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, असलेल्या दोन अनोळखी इसमांनी चिलका यांना दुचाकीवरून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.