

Jalna News: Gondi police take action against sand mafia
शहागड, पुढारी वृत्तसेवाः अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोदडगाव शिवारात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करताना ट्रॅक्टरसह वाळू असा सहा लाख सात हजारांचा मुद्देमाल गोंदी पोलिसांनी जप्त केला.
गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर यांना खबऱ्याने माहिती दिली की, दोदडगाव शिवारात बेकायदेशीररीत्या वाळूचे उत्खनन व साठवण करण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे खांडेकर यांनी उपनिरीक्षक किरण हावले, पोलिस कर्मचारी प्रदीप हवाळे, बहुरे यांनी दोदडगाव शिवारात जाऊन पाहणी केली असता त्यांना तीन इसम अवैधरीत्या वाळूची साठवण करून ती चोरीच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी संशयित ट्रॅक्टरचालक शाम परमेश्वर जगताप (रा. धाकलगाव) यांच्यासह दोन साथीदार हे ट्रॅक्टरमधून दीड ब्रास वाळू वाहतूक करताना निदर्शनास आले. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहा लाख सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना अंबड न्यायालयासमोर हजर केले असता त्यांनी पोलिस कोठडी सुनावली आहे.