

Jalna News: Chain hunger strike to save SC reservation
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : एस.सी. आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करून संविधानिक आरक्षण अबाधित ठेवण्याच्या मागणीसाठी जाफराबाद तहसील कार्यालयासमोर समस्त बौद्ध समाज बांधवांच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला रविवारी १७ दिवस पूर्ण झाले. विशेष म्हणजे, जाफराबाद तालुक्यातील १०२ गावांपैकी दररोज एका गावातील नागरिक या साखळी उपोषणात सहभागी होत असून, आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक जनसमर्थन मिळत आहे.
१७ दिवस उलटूनही शासन-प्रशासनातील एकाही जबाबदार अधिकाऱ्याने आंदोलनाची गंभीर दखल घेतलेली नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
"१७दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असूनही शासनाला जाग येत नसेल, तर हा लोकशाहीचा अपमान आहे. संविधानिक अधिकारांसाठी लढणाऱ्या समाजाच्या भावनांचा अवमान सरकार करत आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, उपोषणस्थळी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात व जालना मनपा नगरसेविका अॅड. रिमाताई खरात यांनी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी एस.सी. आरक्षणाचे उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करत, संविधानिक हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी एस.सी. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती, जाफराबाद तालुक्याचे पदाधिकारी, समस्त बौद्ध समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक व्यापक व तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
तीव्र आंदोलनाचा इशारा
साखळी उपोषणात दररोज तालुक्यातील एका गावातील नागरिक सहभागी होत असल्याने आंदोलनाचा विस्तार सातत्याने वाढत असून, येत्या काही दिवसांत अधिक संघटित व व्यापक आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही आंदोलन समितीच्या वतीने सांगण्यात आले.