chhatrapati sambhaji nagar : वीस वर्षांच्या अन्यायाविरोधात अमळनेरमधील शेतकऱ्यांचे गोदावरीच्या फुगवटा क्षेत्रात जलसमाधी आंदोलन

पाण्याच्या फुगवट्यामुळे अमळनेर-लखमापूर परिसरातील शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
chhatrapati sambhaji nagar
रखरखत्या उन्हात गोदावरीच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात एल्गार.(छाया, रमाकांत बन्सोड)
Published on
Updated on

गंगापूर : जायकवाडी धरणाच्या फुगवट्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून गंगापूर तालुक्यातील अमळनेर-लखमापूर परिसरातील शेती पाण्याखाली जात असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाई व उडवाउडवीच्या भूमिकेविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. १८ मे) अमळनेर शिवारात रखरखत्या उन्हात जलसमाधी आंदोलन छेडले. सकाळी साडेअकरापासून सुरू झालेले हे आंदोलन रात्रीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

फुगवट्यामुळे उभ्या पिकांचे शंभर टक्के नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही जलसंपदा विभाग “फाईल भूमी अभिलेख विभागाकडे आहे” असे सांगत असल्याचा, तर भूमी अभिलेख विभाग “आमचा संबंध नाही” म्हणत जबाब झटकत असल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.

सकाळी ११.३० वाजता शेतकरी कुटुंबीयांसह थेट गोदावरीच्या डोहात उतरले. गोदामाईचे पूजन करून त्यांनी चिखल व खोल पाण्यात उभे राहत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. कडक उन्हात वृद्ध शेतकरी गाळात रुतून उभे होते. अंगावर किडेमुंग्या चढत होत्या, पायात काटे रुतत होते; मात्र प्रशासनाला जाग येत नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत हे पाचवे जलसमाधी आंदोलन आहे. प्रत्येक वेळी लेखी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. “वीस वर्षे पिके गेली, पाच वर्षे आंदोलन केले; तरी प्रशासनाने एकही प्रश्न मार्गी लावला नाही,” असा आरोप आंदोलकांनी केला.

दुपारी प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दीपककुमार डोंगरे तसेच गंगापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत “एफटीएल दाखवा, हद्दीच्या खुणा करा, नुकसानभरपाई द्या, संपादनाची कागदपत्रे कुठे आहेत?” असा खणखणीत जाब विचारला. मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने आंदोलकांचा संताप अधिक वाढला.

“संपादनाची कागदपत्रे शोधून शेतकऱ्यांना देण्यात येतील. काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला,” असे स्पष्टीकरण पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. मात्र शेतकऱ्यांनी ही भूमिका फेटाळून लावत “आता आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी,” असा इशारा दिला. या आंदोलनात इसाभाई पठाण, राधेश्याम कोल्हे, बालचंद पंडित, कडूबाबा पठाण, शिवाजी दरगुडे, समद पठाण, विक्रम पंडित, मुनीर पठाण, जनार्धन मिसाळ, भाऊसाहेब पंडित, गणेश मिसाळ यांच्यासह सुमारे ३० शेतकरी सहभागी झाले होते.

प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही, तर आंदोलन बेमुदत करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून अमळनेर परिसरातील परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news