

Farmers cheated under the pretext of tomato procurement
जालना, पुढारी वृत्तसेवाः गेवराई बाजार फाटा येथे टोमॅटो ठोक खरेदीच्या बहाण्याने परिसरातील ३९ शेतकऱ्यांची १५ लाख ४२ हजार ८८५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात संगमनेर येथील व्यापाऱ्यासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केळीगव्हाण येथील शेतकरी प्रल्हाद बाबूराव टकले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेवराई बाजार फाटा येथील जगदंबा ड्रायव्हर ढाब्यावरील शेडमध्ये 'राधे राधे ट्रेडिंग कंपनी' नावाने टोमॅटो खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते.
संगमनेर तालुक्यातील जोरवा येथील व्यापारी सागर चिमण काकड आणि त्याच्या दोन साथीदारांनी शेतकऱ्यांकडून प्रति किलो १५ रुपये दराने टोमॅटो खरेदी करण्यास सुरुवात केली. आरोपींनी सुरुवातीला शेतकऱ्यांना एकत्र पैसे देण्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून प्रल्हाद टकले, नासेर बागवान, अर्जुन नागवे यांच्यासह ३९ शेतकऱ्यांनी १७ ते २८ सप्टेंबर दरम्यान लाखो रुपयांचे टोमॅटो विकले.
मात्र, नंतर पैशांची मागणी केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी आरोपींनी रातोरात सर्व बस्तान गुंडाळून तेथून पोबारा केला. शेतकऱ्यांनी आरोपीशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता मोबाईल बंद आढळल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेंन्वये विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला.