

Jalna Stabbing incident youth death
जालना : शहरातील मोतीबाग परिसरात रविवारी (दि. २२) सायंकाळी हेल्यांच्या टकरीवरून झालेल्या किरकोळ वादाने विकोप गाठत भीषण रूप धारण केले. या हाणामारीत अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या २८ वर्षीय रवी अशोक लाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोतीबाग परिसरात रविवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हेल्यांच्या टकरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन गटांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला. मात्र, काही क्षणातच हा वाद उग्र होत हाणामारीत परिवर्तित झाला. संतप्त झालेल्या दोन्ही गटांनी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर वार केले.
या हल्ल्यात रवी लाड गंभीर जखमी झाले. त्यांच्या पोटात खोलवर वार झाल्याने तसेच डोक्याला जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री एक वाजता त्यांची प्राणज्योत मालावली.
दरम्यान, या घटनेत प्रेम लाड व नरेश अवघड हे दोघे तरुणही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने कारवाई करत संशयित तीन आरोपींना काही तासांत ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी व पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सदा राठोड, सचिन चौधरी, मतीन शेख, भगवान राठोड व चालक अशोक खरात यांनी पार पाडली.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.