

जालना : जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र भक्तिमय आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले असून अश्विन महिन्यातील नऊ दिवस चालणाऱ्या या पवित्र उत्सवानिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. तर दुसरीकडे, रात्रीच्या वेळी गरबा आणि दांडियाच्या तालावर तरुण-तरुणींसह महिला, पुरुष आणि विविध समाजघटकांतील नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत. भक्ती, परंपरा आणि आधुनिकतेचा सुरेख संगम या उत्सवातून पाहायला मिळत आहे.
गुजराती आणि राजस्थानी संस्कृतीशी नाते सांगणारा पारंपरिक गरबा आणि रास-दांडिया जालन्यातील विविध भागांत आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. शहरातील मोठ्या मैदानांसह गल्लीबोळांतही गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगीबेरंगी पोशाख परिधान करून नागरिक तालबद्ध पावलांनी गरबा खेळताना दिसत आहेत.
लाकडी टिपऱ्यांच्या साहाय्याने खेळले जाणारे पारंपरिक टिपऱ्यांचे नृत्यही ग्रामीण आणि शहरी भागांत उत्सवाची रंगत वाढवत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख चौक, देवीची मंदिरे आणि गरबा मंडळांच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विविध रंगांच्या दिव्यांनी सजलेले परिसर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक भक्तिगीते, आधुनिक गरबा गीते आणि डीजेच्या तालावर रात्री उशिरापर्यंत नृत्याचा जल्लोष सुरू आहे. काही ठिकाणी लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या माध्यमातूनही उत्सवात विशेष रंग भरला जात आहे.गरब्यासाठी महिला आणि मुली चनिया-चोली, तर युवक कुर्ता-पायजमा आणि पारंपरिक गुजराती कपडे परिधान करून सहभागी होत आहेत. आकर्षक दागिने, रंगीबेरंगी पोशाख आणि पारंपरिक नृत्यशैलीमुळे गरबा मैदानांना उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.
गर्दीचे नियोजन; पोलिसांचा बंदोबस्त
नवरात्रोत्सवाच्या काळात भाविक आणि गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रमुख मंडळांकडून नियोजन केले जात आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जालना पोलिसांकडूनही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत जालन्यातील नवरात्रोत्सव नागरिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे.