

जालना : प्रशासक राज संपून तीन महिने उलटले. लोकप्रतिनिधींच्या हाती महापालिकेची सत्ता आली. मात्र, महापालिकेच्या कारभाऱ्यांना चसण्यासाठी नीटनेटके दालन नसल्यामुळे त्यांनी मंडपात बसून आपला कारभार सुरू केला आहे. यामुळे अजून किती दिवस कारभाऱ्यांना दालनाची प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, निवडणुकीला तीन महिने उलटूनही विषय समितीच्या सभापतींना अद्याप केबिन उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. प्रशासनाच्या या विसाळ आणि उदासीन भूमिकेमुळे अखेर स्थायी समितीचे सभापती अशोक पांगारकर आणि संध्या देठे यांनी थेट महापालिका परिसरात मंडप टाकूनच कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सभापतींची निवड झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र केबिन देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असताना, दोन सर्वसाधारण सभा पार पडूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही परिणामी, लोकांच्या तक्रारी आणि प्रश्न सोडवायचे कसे, असा गंभीर प्रश्न सभापतीसमोर उभा राहिला.
प्रशासनाच्या निष्क्रियतेला कंटाळून अखेर
स्थायी समितीचे सभापती अशीक पांगारकर आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती संध्या देठे यांनी महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये मंडप उभारून तेथूनच जनतेच्या समस्या ऐकण्यास आणि निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. केबिन मिळेपर्यंत आम्ही इथूनच कामकाज चालू ठेवणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रशासन जागे कधी होणार ?
सभापतींनी महापालिकेच्या आवारात मंडप टाकून आपला कारभार सुरू केला आहे. महापालिका प्रशासनाने अजूनही या सभापतीना दालनाची सोय करून दिली नाही. यामुळे महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, की मंडपातच चालणार महापालिकेचा कारभार, असा सवाल जालन्यातील नागरिक विचारत आहेत.