

कन्नड : कन्नड–पिशोर रोडवर झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मयुर अनिल बाविस्कर (वय २९, रा. भिलपलटण, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मयुर बाविस्कर हा शुक्रवारी पिशोर येथे आजोबांच्या अंत्यविधीसाठी गेला होता. अंत्यविधी आटोपून तो दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने कन्नडकडे परत येत असताना कन्नड–पिशोर रस्त्यावर त्याचा अपघात झाला. दरम्यान, त्याची मोटारसायकल अचानक रस्त्याखाली उतरली व रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबावर जोरात धडकली.
या अपघातात मयुरच्या डोक्याला गंभीर मार लागून तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत त्याला कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोहेल शेख यांनी तपासणी करून मयुरला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून मयुरच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.