

Jalna kidnapped youth dead body found
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथुन शनिवारी रात्री गावठी पिस्तुल व कुन्हाडीचा धाक दाखवुन राजाटाकळी येथील सुरेश तुकाराम आर्दड (३३) याचे कारमधुन अपहरण करण्यात आले होते. रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा हद्दीत सुरेशचा मृतदेह आढळुन आला. त्याच्या अंगावर असलेल्या मारहाणीच्या खुणांमुळे त्याचा खुन झाल्याचा संशय आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथून शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल आणि कुन्हाडीचा धाक दाखवून सुरेश तुकाराम आर्दड या तरुणाचे चार जणांनी चारचाकी वाहनामध्ये कोंबून अपहरण केल्याची माहीती सुभाष लळीतराव आर्दड यांनी घनसांवगी पोलिस ठाण्यात दिली.
सुरेश आर्दड याचे आई-वडील पंढरपुर येथे वारीला जात असतांनाच त्यांना माहीती मिळाल्याने ते परत आले. दरम्यान, अपहरण झालेल्या सुरेश तुकाराम आर्दड याचा मृतदेह रविवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडेगाव टाकरखेडा रोडवर शेतात आढळून आला. त्यामुळे अपहरण कर्त्यांनी सुरेश तुकाराम आर्दड यांचा खून करून त्याचे प्रेत दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन फेकून दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सुरेश अर्दड यांचे चुलत भाऊ सुभाष आर्दड यांच्या फिर्यादीवरून हरी कल्याण तौर, सखाराम उर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (रा. राजा टाकळी), हिनाज बाबामिया सय्यद (रा. कु. पिंपळगाव) आणि चारचाकी वाहनाचा चालक महादु या चार जणांविरुद्ध अपहरण आणि शास्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मयत सुरेश आर्दड याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. पोलिस खुनाच्या कारणाचा शोध घेत असल्याची माहीती मिळाली. मागील भांडणाच्या कारणावरुन अपहरण व खुनाचा प्रकार घडल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याची माहीती सुत्रांनी दिली. हा खुन कोणत्या कारणावरुन झाला याचाही शोध घेण्यात येत आहे. या प्रकरामुळे कुंभार पिंपळगाव परिसरात खळबळ उडाली आहे.