

जालना ः जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पक्षीजगताविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बुधवार (11) रोजी शहरात पहिल्यांदाच विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कन्हैया नगर येथील वन प्रशिक्षण विद्यालयात हा उपक्रम पार पडणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पक्षीप्रेमींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी सुरेश वडोदे यांनी केले आहे.
या संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे जालना जिल्ह्याचे पक्षी वैभव उलगडणारा स्लाईड शो तसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर गिराम यांच्या दुर्मिळ पक्षी छायाचित्रांचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात येणार आहे. तसेच अकोला येथील राज्य कार्यकारिणी सदस्य आणि संमेलनाचे आयोजक अमोल सावंत यांचा ‘माझे पक्षी अभयारण्य’ हा विशेष स्लाईड शो विद्यार्थ्यांना पाहता येईल.
केवळ व्याख्याने न ठेवता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम घरटी कशी तयार करावीत, याचे प्रात्यक्षिक दिले जाईल. तसेच पक्षी चित्रकला स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा घेण्यात येईल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून इको क्लबचे किमान 10 प्रतिनिधी विद्यार्थी या संमेलनात सहभागी होणार आहेत. हे संमेलन सकाळी 10.30 ते दुपारी 3 या वेळेत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला विभागीय वन अधिकारी सुरेश वडोदे, अमोल सावंत, ज्ञानेश्वर गिराम, मधुकर गायकवाड, मयूर साबळे, सुभाष पारे यासह सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात कार्यशाळा व प्रात्यक्षिक
केवळ व्याख्याने न ठेवता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृत्रिम घरटी कशी तयार करावीत, याचे प्रात्यक्षिक दिले जाईल. तसेच पक्षी चित्रकला स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा घेण्यात येईल.