

Godavari River Farmers Agitation
शहागड : अंबड तालुक्यातील गोंदी येथे मंगळवारी (दि. १७) सकाळी शेतकऱ्यांनी गोंदेश्वर मंदिरामागील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन छेडले. विविध मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात शेतकऱ्यांनी नदीत उड्या घेत सरकार आणि पिक विमा कंपन्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांची मुख्य मागणी म्हणजे २०२५ सालच्या खरीप हंगामासाठीचा पिक विमा तात्काळ मिळावा. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर तसेच मोसंबी, डाळिंब यांसारख्या फळबागा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हाती आलेले उत्पादन अक्षरशः मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मात्र, अद्याप विमा कंपन्यांकडून भरपाई मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
याशिवाय सरसकट कर्जमाफीची मागणीही आंदोलकांनी केली. याच मागण्यांसाठी मागील वर्षीही शेतकऱ्यांनी आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी गोदावरीच्या पाण्यात उतरून "पिक विमा आमचा हक्क आहे" अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. जूनपासून खरीप हंगाम सुरू होणार असून, विम्याची रक्कम मिळाल्यास पेरणीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला. दुपारपर्यंत कोणताही जबाबदार अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याचेही सांगण्यात आले. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
आंदोलनादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी गोंदी पोलिसांकडून नदीपात्राजवळ कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मच्छीमार व होड्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे यांच्यासह इतर कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
या आंदोलनात गोंदी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. काही शेतकरी अर्धनग्न अवस्थेत पाण्यात उतरून हातात मागण्यांचे फलक घेऊन आंदोलन करत होते.