जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी (दि. 23) जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. तसेच बदनापूर मतदारसंघाची बदनापूर येथील कृषी महाविद्यालयात मतमोजणी सकाळी ७ पासून फेरनिहाय मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरकडून येणारी व ग्रेडर टी पॉइंट पासून ते छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहतूक ही हॉटेल इंद्रायणी चौक, चंदनझिरा पासून ते ग्रेडर टी पॉईंट पर्यंत छत्रपती संभाजीनगर ते जालना हायवे रोडवरुन एक मार्गी म्हणजे जालना ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रस्त्याने होईल.
जालना ते छत्रपती संभाजीनगर, जालना एमआयडीसीकडे जाणारी वाहतूक ग्रेडर टी पाँईटपासून ते हॉटेल इंद्रायणी चौक चंदनझिरापर्यंत जालना ते छत्रपती संभाजीनगर हायवे रोडने एकमार्गी होईल.
जालना ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी व छत्रपती संभाजीनगरकडून जालनाकडे येणारी वाहतूक बदनापूर ते सोमठाणा फाटा व सोमठाणा फाटा ते बदनापूर अशी एक मार्गी म्हणजे जालना ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रस्त्याने होईल. शनिवारी (दि.23) सकाळी 5 पासून मतमोजणी संपेपर्यंत या मार्गाने वाहतूक सुरू राहणार आहे.