

जालना, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कालावधीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान या कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ४ पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये १७२ गुन्हे नोंद करण्यात आले. त्यात १५२ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३९ लाख ८१ हजार ९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ८ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
निवडणूक कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणवर अवैध मद्य वाहतूक होण्याची शक्यता असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार वाहन तपासणी करणे, संशयित ठिकाणांवर छापे टाकणे व रात्रीच्या वेळी गस्त घालणे अशी कारवाई करण्यात येत आहे.
ढाब्यांवर होणाऱ्या अवैध मद्यविक्रीवरसुध्दा विभाग लक्ष ठेवून आहे. कलम-९३ अंतर्गत सराईत गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीबाबतचे बंधपत्र घेण्यासाठी संबंधित प्रातांधिकारी यांना ६० प्रस्ताव सादर करण्यात आले असून त्यापैकी ११ लाख रुपये किमतीचे २२ बंधपत्र घेण्यात आले आहेत.
निवडणूक कालावधीमध्ये सदर बंधपत्राचा भंग केल्यास संबंधित गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आचारसंहिता कालावधीमध्ये मद्यविक्री अनुज्ञप्त्या विहित वेळेत उघडणे व बंद करणे यावर क्षेत्रीय अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. या नियमांचे उल्लघन करणाऱ्या अनुज्ञप्तींवर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने कगरण्यात आले आहे.
अनुज्ञप्तीधारकांडून कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही व कायद्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा कसे? याबाबत तपासणी करण्यासाठी सर्व निरीक्षक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात अनुज्ञप्तींचे सखोल निरीक्षणाच्या विशेष मोहीम राबविण्यात आल्या आहेत.