

Asha Worker Salary Delay
सागर देशमुख
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील आशासेविकांचे मानधन वेळेवर जमा होत नसल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. वाढीव मानधन फेब्रुवारीपासून अद्याप खात्यात जमा झालेले नाही, तर नियमित मासिक मानधनाचेही चार महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आशासेविकांसमोर घरखर्च भागवायचा कसा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पारध बुद्रुक येथे ७, पारध खुर्द येथे २ आणि पद्मावती येथे १ अशा एकूण १० आशासेविका पारध उपकेंद्रांतर्गत कार्यरत आहेत. गावागावांत आरोग्य विभागाच्या विविध योजना, लसीकरण, गर्भवती महिलांची माहिती, आरोग्य सर्वेक्षण, जनजागृती यासह शासनाच्या आरोग्यविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी या आशासेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
मात्र, नागरिकांच्या आरोग्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या या आशासेविकांनाच त्यांच्या मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
आशासेविकांना मिळणारे नियमित मासिक मानधन तब्बल चार महिन्यांपासून खात्यात जमा झालेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच फेब्रुवारीपासून वाढीव मानधनाची रक्कमही प्रलंबित असल्याने आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत.
यंदा परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिके सुकून गेल्याने ग्रामीण कुटुंबांवर आधीच आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत मानधनही वेळेवर मिळत नसल्याने आशासेविकांच्या कुटुंबीयांच्या दैनंदिन खर्चाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पारध उपकेंद्रांतर्गत कार्यरत १० आशासेविकांचे प्रलंबित नियमित मानधन तसेच फेब्रुवारीपासून रखडलेले वाढीव मानधन तातडीने अदा करावे, अशी मागणी होत आहे. आरोग्य विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशासेविकांच्या मानधनाचा प्रश्न प्रशासनाने तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे.
“आरोग्यसेवा देणाऱ्यांचेच मानधन थकीत; प्रशासनाने आता तरी जागे व्हावे!” अशी भावना व्यक्त होत आहे.
आम्ही गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नियमितपणे काम करतो. शासनाच्या आरोग्यविषयक विविध कामांची जबाबदारी पार पाडतो. मात्र, चार महिन्यांपासून नियमित मानधन मिळालेले नाही. वाढीव मानधनाची रक्कमही फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. त्यातच पाऊस नसल्याने शेतीचेही नुकसान झाले आहे. शासनाने आमच्या प्रलंबित मानधनासह वाढीव मानधनाची रक्कम तातडीने खात्यात जमा करावी.
- ज्योती बोडखे (आशासेविका)