

Jalna armed robbery in farm house
तीर्थपुरी: घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा- सिद्धेश्वर पिंपळगाव रस्त्यावरील शेतात राहणाऱ्या कुटुंबावर चोरट्यांनी हल्ला करत जबरी दरोडा घातला.
सशस्त्र हत्याराने पती-पत्नीस मारहाण केलाी. या जबर मारहाणीत पती बेशुद्ध तर पत्नीच्या हाताची तीन बोटे कापली गेल्याची घटना (दि. ३ ) रात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे.
याविषयी सविस्तर असे की, घनसावंगी तालुक्यातील खापरदे हिवरा सिद्धेश्वर पिंपळगाव रस्त्यावरील बिबन भाई पठाण (वय ७०) व सलीमा पठाण (वय ६५) आई बिलोलाबाई पठाण हे कुटुंब गेली कित्येक वर्षापासून आपल्या शेतात राहत होते.
मात्र शनिवारी रात्री अचानक एकच्या सुमारास या कुटुंबावर एकूण चार दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली.
यामध्ये बिबनभाई पठाण यांच्या डोक्याला जबर तलवारीचे वार झाल्यामुळे ते सकाळपर्यंत बेशुद्ध अवस्थेत होते. तर पत्नीच्या हाताची तीन बोटे देखील कापली गेली आहेत.
तसेच महिलेच्या गळ्यातील मनी पोत मोरणी व कानातील फुल असा एकूण एक लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज व घरातील ५० ते ६० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळवली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
यामध्ये बिबनभाई पठाण व पत्नी सलीमा पठाण यांना घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना जालना येथे खाजगी रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहमद यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. लवकरच चोरट्यांना पकडले जाईल असेही त्यांनी सांगितले.