

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार (दि.2) रोजी विविध शेतीमालाची एकूण 12 हजार 42 क्विंटल आवक झाली. दिवसभरात सुमारे 4 कोटी 43 लाख 49 हजार रुपयांच्या व्यवहारांची नोंद झाली. ज्वारी, तूर, हरभरा आणि सोयाबीनला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
बाजार समितीच्या दैनंदिन अहवालानुसार, ज्वारीची सर्वाधिक 3 हजार 649 क्विंटल आवक झाली. ज्वारीला प्रतिक्विंटल 2,200 ते 4,350 रुपये दर मिळाला असून सरासरी भाव 3,200 रुपये राहिला. गव्हाची 2 हजार 987 क्विंटल आवक झाली असून गव्हाला 2,100 ते 2,400 रुपये दर मिळाला.
हिरव्या बाजरीची 1 हजार 186 क्विंटल आवक झाली. बाजरीला कमाल 2,481 रुपये तर सरासरी 2,200 रुपये भाव मिळाला. मक्याची 1 हजार 114 क्विंटल आवक नोंदविण्यात आली असून त्याला 1,500 ते 2,098 रुपये दर मिळाला. कडधान्यांमध्ये पांढऱ्या तुरीला सर्वाधिक 8,151 रुपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला.
सोयाबीनला 7400 रुपये दर
तेलबियांमध्ये सोयाबीनची 677 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला 6,800 ते 7,400 रुपये दर मिळाला असून सरासरी भाव 7,050 रुपये राहिला. सूर्यफूलाला 6,500 रुपये कमाल दर मिळाला. मूग, उडीद आणि राजमा यांची आवक अत्यल्प राहिली. मुगाला 7,150 रुपये, उडदाला 7,200 रुपये तर राजम्याला 4,700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गुळाला सरासरी 4,041 रुपये भाव मिळाल्याची नोंद बाजार समितीच्या अहवालात करण्यात आली आहे.