

सादिक शेख
आन्वा: भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूलमध्ये विज्ञान, इंग्रजी आणि गणित या विषयांच्या रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा तात्काळ १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत भरा. अन्यथा जागा न भरल्यास आत्मदहन करण्याचा इशारा एका निवेदनातून देण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांना ४ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या चार वर्षांपासून या प्रशालेतील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
प्रशालेतील रिक्त शिक्षक पदे भरण्याबाबत शालेय व्यवस्थापन समिती व पालकावर्गाकडून वारंवार मागणी करण्यात आली आहे. आन्वा येथील जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीचे वर्ग असून एकूण ६०३ विद्यार्थी शिकत आहेत. येथे शिक्षकांची एकूण २० पदे मंजूर असताना त्यापैकी ८ पदे रिक्त आहेत.
विज्ञान, इंग्रजी आणि गणित हे प्रमुख विषय शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याआधी वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने आणि निवेदने देऊनही प्रशासनाने रिक्त पदे न भरल्यामुळेच हे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दि.१४ ऑगस्ट २०२६ पर्यंत कायमस्वरूपी पदे न भरल्यास १५ ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या दालनात आत्मदहन करण्यात येईल.
या सर्व प्रकारची व अनुचित घटनेची जबाबदारी शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर राहील, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या निवेदनावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंपाल देवचंद कुठांबरे, उपाध्यक्ष गुलाबराव भागाजी चंडोल, सदस्य कैलास विठ्ठलराव हजारी यांच्यासह अनेक पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ व पालकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.