

डोणगाव : जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण व परिसरातील शेतशिवारात रोही (निलगाय) आणि हरिणांच्या कळपांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. मिरची, सोयाबीन, मका, तूर आणि कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, दररोज रात्री १० ते १५ रोही (निलगाय) व हरिणांचे कळप शेतात घुसून पिके फस्त करत आहेत केवळ पिके खाणेच नव्हे, तर धावाधाव करून संपूर्ण शेत तुडवत असल्याने अनेक एकरांवरील मिरची, सोयाबीन, मका, तूर व कपाशीची पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
या संदर्भात वनविभागाकडे तोंडी व लेखी तक्रारी करूनही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रोही व हरिणांचा तातडीने बंदोबस्त करण्याची, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून त्वरित आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे. अन्यथा वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
मी साडेतीन एकर क्षेत्रांत लाखो रुपये खर्च करून मिरची पिकाची लागवड केली. आता परिसरातील रोही (निलगाय) व हरिणांच्या कळपांनी शेतात घुसून जोमात आलेले मिरची पीक मोठ्या प्रमाणात फस्त केले आहे. प्रचंड आर्थिक नुकसान झाले. वनविभागाने तातडीने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
संदीप उगले, शेतकरी, देळेगव्हाण